जयपूर: राजस्थान विधानसभेचे सत्र 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राजस्थान विधानसभेत भाजपने अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली.
भाजपाच्या आमदारांची बैठक गुरुवारी जयपूरमध्ये पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही सहभागी झाल्या होत्या. अधिवेशनात कोरोना, लॉकडाउन आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच राजस्थान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यचाही निर्णय घेतला आहे.
अशोक गेहलोत सरकार लवकरच पडणार आहे असं भाजपानेही म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आपल्या घरातले भांडण मिटवू पाहते मात्र ते मिटवणं त्यांना शक्य नाही.त्यामुळे गेहलोत सरकार लवकरच कोसळणार आहे असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे. आपल्याच अंतर्विरोधामुळे हे सरकार पडणार आहे. मात्र काहीही कारण नसताना काँग्रेस आपल्या अपयशाचं खापर काँग्रेस भाजपावर फोडते आहे. असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे.
विधानसभा सत्राअगोदर आज अशोक गहलोत यांच्या शासकीय निवासस्थानी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. यामध्ये सचिन पायलट आणि त्यांच्या मतदारसंघाच्या आमदारांनाही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे.