नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेत दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक पार पडली. खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीला खासदार नारायण राणेही उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांना जास्तीत जास्त वेळ देण्यासही शाहांनी सांगितल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे खासदार नारायण राणेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यानंतर राणे आणि शाह यांची स्वतंत्र बैठक झाली.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजप सावध पावलं उचलताना दिसत आहे. मात्र शिवसेनेसोबत युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.