नवी दिल्ली : 'गांधी परिवार चोर है'ची घोषणाबाजी, संसदेत उडवलेली कागदी विमानं, अनिल अंबानी AA, तर क्वात्रोची झाला 'Q'. संसदेत खासदार फक्त गोंधळच घालायला येतात, अशी एव्हाना देशातल्या जनतेची समजूत झाली असेल. कुणीही कुणालाही नीट बोलू देत नाही. म्हणजे बालवाडीतली पोरं परवडली, पण संसदेतले खासदार बहुदा कामकाजात व्यत्यत आणण्यासाठी प्रशिक्षित केलेले असावेत.

देशाचे अर्थमंत्री राफेलवर बोलत असताना कुणी तरी भाजपचे खासदार थेट गांधी घराण्यावर घसरले. त्यांनी थेट 'गांधी परिवार चोर है, माँ बेटा चोर है' अशा घोषणा दिल्या. हे सगळं होत असताना, राहुल गांधी शांत होते. पण नंतर त्यांच्या सवंगड्यांनाही संधी मिळाली. त्यांनी तर कागदी विमानं उडवून संसदेची इयत्ता पाचवी ब करुन टाकली.

अखेर क्लास टीचर भडकल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे कान उपटले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बालपणी कागदाची विमानं भिरकावली नव्हती का? असं म्हणत सर्वांना खडसावलं.
राफेलवरुन लोकसभेत घमासान; राहुल गांधींचे प्रश्न, जेटलींची उत्तरं

शाळेत जशी मुलं कोड लँग्वेजमध्ये बोलतात, तशीच सवय आपल्या नेत्यांनाही लागली. राहुल गांधी आणि अरुण जेटली यांनीही तोच कित्ता गिरवला. राहुल गांधींनी अनिल अंबानींना AA म्हणून संबोधता येईल का, असं विचारलं, तर जेटलींनी राहुल गांधी 'Q' यांच्या मांडीवर खेळल्याचा घणाघात केला.

परीक्षा तोंडावर आहे आणि सगळ्यांचाच अभ्यास जोरात सुरु आहे. पास कोण होतं, हेच पहायचं आहे. पण वार्षिक परीक्षेपर्यंत संसदेची भाजी मंडई होणार हे निश्चित.