भोपाळ : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली आहे. मात्र भाजपने त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार फोडण्यास सुरुवात केल्याचा गंभीर आरोप बसपाच्या मध्य प्रदेशातील बहुजन समाजा पक्षाच्या आमदार रमाबाई यांनी केला आहे.
भाजपला समर्थन देण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपये आणि मंत्रीपदाचं आमिष दाखवलं जात आहे, असा आरोप आमदार रमाबाई यांनी केला आहे. भाजप प्रत्येक आमदाराला ऑफर देत आहे. केवळ मुर्ख लोकचं भाजपच्या ऑफरला भुलतील. मला देखील फोन करून मंत्रीपद आणि पैशांची ऑफर देण्यात आली. अनेक आमदारांना भाजपकडून 50-60 कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा आरोप रमाबाई यांनी केला.
मध्य प्रदेशात बसपाने काँग्रेसला समर्थन दिलं आहे. काँग्रेसने बसपा आणि सपाच्या नाराज आमदारांना खुश करण्यासाठी मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवं होतं. नाराज असलो तरी आपण कमलनाथ सरकार सोबत असल्याचं रमाबाई यांनी स्पष्ट केलं आहे. कमलनाथ यांच्या सरकारवर कोणतंही संकट येऊ देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
भाजपची खेळी ओळखून सर्वांनी एकजूट दाखवावी, असं आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे. सर्व मंत्र्यांनी विरोधकांचं षडयंत्र यशस्वी होऊ नये, यासाठी काम केलं पाहिजे. तसेच काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचंही कमलनाथ यांनी सांगितलं.
कर्नाटकातही काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात
मध्य प्रदेशप्रमाणे कर्नाटकातही भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर सावध झालेल्या काँग्रेसने 29 मे रोजी संध्याकाळी बंगळुरु येथे आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रमेश जारकिहोली यांनी भाजपमध्ये जाण्याची आणि सोबत काही आमदारांना नेण्याची धमकी दिली आहे. काँग्रेस आणि जेडीएचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.