नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या 23 दिवसांमध्ये संसदेचं कामकाज चाललेलं नाही, त्या काळातला पगार आणि भत्ते न घेण्याचा निर्णय भाजप-एनडीएच्या खासदारांनी घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

''काँग्रेसच्या राजकारणामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज ठप्प आहे. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र काँग्रेस सभागृह चालू द्यायला तयार नाही,'' असं अनंत कुमार यांनी म्हटलं आहे.

''अधिवेशन काळात खर्च होणारा पैसा हा लोकांचा आहे आणि आम्ही काम करत नसू, तर तो पैसा घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे या काळातील 23 दिवसांचा पगार आणि भत्ते लोकहितासाठी वापरु,'' असं अनंत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

संसदेचं कामकाज चालवण्यासाठी एका मिनिटाला लाखोंचा खर्च येतो. मात्र सभागृहातील राजकीय गदारोळामुळे जनतेचा हा पैसा व्यर्थ जातो. 29 जानेवारी रोजी सुरु झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरी अजून नीट कामकाज झालेलं नाही. दररोज विविध मुद्द्यांवरुन सभागृहाचं कामकाज ठप्प होत आहे.