दिल्ली : आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी नेत्यांनी दबाव आणू नये असं मोदींनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कालपासून सुरु आहे. यात आगामी निवडणुकांसोबतच अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
नोटाबंदीनंतर भाजप कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यावर चर्चा आणि नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीआधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. कार्यकारिणीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी पाच राज्यातील निवडणुका, नोटबंदी, भ्रष्टाचार आणि भारतीय संस्कृतीच्या मुद्द्यांना हात घातला. तसंच पाच राज्यातील निवडणुकीत कोणत्याही नेत्यानं नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव आणू नये, असं मोदींनी ठणकावलं आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या भाषणातील मुद्दे स्पष्ट केले.
नोटबंदीला देशभरातून पाठिंबा मिळाला असून नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मात्र अजूनही भ्रष्टाचार मोठी समस्या असून येणाऱ्या काळात आणखी कठोर निर्णय घेण्यात येतील, असे संकेतही मोदींनी दिल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.