पटणा : बिहारच्या लौरिया विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार विनय बिहारी सोमवारी विधानसभेत बंडी आणि हाफ पॅन्ट घालून दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आपल्या मतदार संघात रस्ते बांधणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करत आहेत, पण राज्य सरकारकडून त्यांना योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आपला निषेध अशाप्रकारे व्यक्त केला.
गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी कुर्ता आणि पायजम्याचा त्याग केला असून, जोपर्यंत आपल्या मतदार संघात रस्ते उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात नाही, तोपर्यंत आपण सर्व कपडे परिधान करणार नसल्याचा, पण त्यांनी केलाय. विशेष म्हणजे, गेल्या हिवाळी अधिवेशनातही विनय बिहारी हाफ पॅन्ट आणि बंडीमध्ये विधानसभेत दाखल झाले होते.
गेल्या शुक्रवारपासून बिहारच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विनय बिहारी हाफ पॅन्ट आणि बंडी घालून दाखल झाले. यावेळी ते विधासभेत येताना रस्त्यांवरुन साष्टांग दंडवत घालत येत होते.
विनय बिहारींचा हा प्रकार पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना रस्ते बांधणीचं आश्वासन दिलं. पण असं न झाल्यानं आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी पुन्हा सोमवारी साष्टांग दंडवत घातले.
दरम्यान, बिहारींची ही कृती पाहून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे रस्ते विकासमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात 37 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हा निधी त्यांनी केंद्र सरकारच्या तीन रस्ते विकास कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करुन दिला. विशेष म्हणजे यानंतर स्वत: तेजस्वी यादव यांनीच बिहारी यांना कपडे परिधान केले.