बरेली : बलात्काराच्या घटना थांबवता येऊ शकत नाहीत, त्यामुळे एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एखाद-दुसऱ्या घटना घडल्या, तर त्याचं अवडंबर माजवू नका, असं वक्तव्य केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केलं आहे. कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादंग माजण्याची शक्यता आहे.


'अशा घटना दुर्दैवी परिस्थितीत घडतात. सरकार याबाबत योग्य ती पावलं उचलत आहे' असं गंगवार म्हणाले. जम्मू आणि काश्मिरमधील कठुआत चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संतोष गंगवार प्रतिक्रिया देत होते.

बलात्काराची आकडेवारी काय सांगते?

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये बलात्काराच्या 38 हजार 947 घटना घडल्या. म्हणजेच देशात दररोज 107 बलात्कार झाले. या हिशोबाने दर तासाला चार जणी बलात्काराच्या बळी ठरल्या.

बलात्काराच्या 38 हजार 947 घटनांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2 हजार 116 मुलींचा समावेश आहे.

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या अडीच तासांच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी!

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा अंमलात येणार आहे. यानंतर घडणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच्या प्रकरणात कायद्यातील नव्या तरतुदी लागू होतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' अर्थात पॉक्सो कायद्यात सुधारणा करण्याला परवानगी दिली आहे. सध्या पॉक्सो कायद्यात जास्तीत जास्त जन्मठेप आणि कमीत कमी सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.