नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीत मनसेसोबत संभाव्य युतीबाबत महत्वाचं वक्तव्य एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल झालेल्या राज ठाकरे यांच्या भेटीबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती देणार आहे.  शेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांना घ्यायचा आहे.  हेतू तो नाही पण भेटल्यानंतर विषय निघेल.  अमित शाह यांची भेट मिळाली की ब्रीफिंग तर करणार आहे.  ते इतकं अपडेट असतात की त्यांनी  विचारण्याआधी सांगितलेलं बरं, असं पाटील म्हणाले. ते म्हणाले की,  शेवटी निर्णय तुम्हालाच करायचा आहे,  कारण याचे काही परिणाम देशपातळीवर देखील होऊ शकतात, असं पाटील म्हणाले. 


राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, परप्रांतियांबाबत राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न


देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या दिल्ली भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणाले की,  देवेंद्र  फडणवीस आणि आशिष शेलार यांचे दिल्लीत येणं हे कॉमन आहे. स्वतंत्र भेटी होणं हे पण कॉमन आहे का हा प्रश्न पुढे विचारला त्यावर ते म्हणाले स्वतंत्र भेटी होणं पण काही विशेष नाही. चंद्रकात पाटील हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत राम शिंदे, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, संजय कुटे हे भाजप नेते देखील आहेत.


काल राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज ठाकरे यांच्याशी भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युतीबाबत आज चर्चा झाली नाही. आजची भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. युतीसाठी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा नाही. परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.  चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्यानं कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. नाशिकमध्ये झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मी अहंकार मानणारा नेता नाही. कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणं ही परंपरा आहे.