तिरुवनंतपुरम : पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं आणि तिच्या इच्छेच्या विरोधात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे वैवाहिक बलात्कार आहे. या कारणामुळे पत्नीला आपल्या पतीपासून घटस्फोट घेता येईल असा महत्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. केरळ फॅमेली कोर्टने दिलेल्या घटस्फोटासंबंधी एका निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळताना केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
या खटल्याची सुनावनी करताना न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागत यांच्या खंडपीठाने सांगितलं की, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी धर्मनिरपेक्ष कायद्याच्या कक्षेत याव्यात आणि आता देशात पुन्हा एकदा विवाह कायदा नव्यानं तयार करण्याची वेळ आली आहे. खंडपीठाने ही याचिका फेटाळताना स्पष्ट केलं की, फौजदारी कायद्यांप्रमाणे वैवाहिक बलात्काराला आपल्या देशात मान्यता नाही, केवळ या कारणामुळे ही गोष्ट न्यायालयाच्या दृष्टीने क्रुर नाही असं होणार नाही. ही गोष्ट न्यायालयाच्या दृष्टीने क्रुरच आहे आणि वैवाहिक बलात्कार हा घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार आहे.
केरळ फॅमेली कोर्टने एका प्रकरणात वैवाहिक बलात्काराचे कारण देत पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि फॅमेली कोर्टचा निर्णय बदलावा, आपल्या वैवाहिक अधिकारांचे संरक्षण करावं अशी विनंती केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका
फेटाळताना सांगितलं की, पत्नीच्या शरीराला पतीने आपली संपत्ती समजणं आणि तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे वैवाहिक बलात्कारच आहे. हे कारण घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार असेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
या खटल्यातील दाम्पत्याचा विवाह 1995 साली झाला होता. पेशाने डॉक्टर असलेल्या पतीने विवाहाच्या वेळी आपल्या पत्नीच्या घरच्यांकडून सोन्याचे 501 शिक्के, एक कार आणि एक फ्लॅट घेतला होता. यावर फॅमेली न्यायालयाने सांगितलं की, पती हा पत्नीकडे पैसे कमवण्याचं मशिन या दृष्टीकोनातून पाहतो आणि तशा प्रकारचा व्यवहार करतो.
पत्नीने केवळ विवाह झाल्यामुळे पतीचे हे सर्व प्रकार सहन केले. पण शेवटी हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे गेल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केला.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवांमुळं खळबळ
- MSD Twitter Verification : ट्विटरकडून एमएस धोनीचं अकाउंट पुन्हा व्हेरिफाइड, ब्लू टिक परत केली
- Rabindranath Tagore : रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या दहा महत्वाच्या गोष्टी