Farmers Kidnap BJP Leaders: केदारनाथ येथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले. रोहतक येथील किलोई गावातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री मनीष ग्रोवर आणि अन्य नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले. इतकंच नव्हे तर या शेतकऱ्यांनी मंदिराबाहेर असणाऱ्या भाजप नेत्यांच्या वाहनांच्या टायरमधील हवा काढली होती. शेतकऱ्यांचा विरोध पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले होते. अखेर काही तासांनी भाजप नेत्यांची सुखरूप सुटका झाली. 


भाजप नेत्यांना पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी टीव्ही प्रसारणात अडथळे आणले. संयुक्त किसान मोर्चाने भाजप आणि जेपीपी नेत्यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार हा विरोध करण्यात आला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमांना विरोध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. रोहतक जिल्ह्यातील किलोई गावातील प्राचीन शिव मंदिरात भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले होते. 


शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना ओलीस ठेवल्याची बातमी समजताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर काही तासानंतर सर्व भाजप नेत्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी भाजप नेत्यांवरही टीका केली. देशाचे पंतप्रधान आणि भाजप नेत्यांकडून धर्माच्या नावावर लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हा कुटिल डाव लक्षात आला आहे. भाजप नेते मंदिर, धर्मशाळेत भेटी देत आहेत. तर, शेतकऱ्यांना धान्य विकण्यासाठी बाजारात हेलपाटे घालावे लागत आहे. 


उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूजा-दर्शनसह जवळपास 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा सोहळा सुरू असताना देशभरातील शिव मंदिरात भाजपकडून थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. 


संबंधित वृत्त : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी, 400 कोटींच्या योजनांसह शंकराचार्यांच्या मूर्तीचं केलं अनावरण