PM Modi Kedarnath Visit : दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पाचवा केदारनाथ दौरा आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा भोलेनाथांची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. 2013 मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केलं.
जय बाबा केदारनाथ अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाप्रलयामुळे मोठं नुकसान झालं होतं. हे खूप मोठं नुकसानं होतं. येथे येणाऱ्या लोकांना पुन्हा केदारनाथ धाम पहिल्यासारखं होईल का? असं वाटत होतं. पण हे पहिल्यापेक्षा चांगलं होईल, असं मला वाटत होतं. रामचरित मानसमध्ये म्हटलंय की, काही अनुभव इतके वेगळे असतात की ते शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. असाच अनुभव केदारनाथमध्ये येतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केदारनाथमध्ये 130 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. त्यासोबतच 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर येणार असल्यामुळे केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांनी सजावट कऱण्यात आली होती.
पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचे अनेक केदारनाथ दौरे
2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये पुन्हा विकासकार्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सलग केदारनाथचे दैरे केले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नवं केदारपुरी वसवण्याचा संकल्प घेतला होता. या अनुषंगानं काम सुरु आहे. नव्या केदारपुरी निर्माणाचं काम जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पूर्म झालं आहे. तसेच, सहा नोव्हेंबर रोजी केदारनाथची दारंही बंद होणार आहेत.