कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता एक ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डे ला दक्षिण कोलकाताच्या न्यू अलीपूरमधून 100 ग्राम कोकेनसोबत अटक करण्यात आलं आहे.


रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डेला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


कोलकात्याच्या नवीन अलीपूर येथून भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याच्या महासचिव पामेला गोस्वामी यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अवैध कोकीन जप्त केले आहे. यावेळी पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्या प्रोबीर कुमार डे या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.


पोलिसांनी सांगितलं की, संबंधित भाजपची युवा कार्यकर्तीला नशेच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांना अगोदर पासूनच होती. पोलिसांनी रस्त्यावर तपासणी सुरू असताना पामेला यांची कार थांबवली. यावेळी त्यांच्या कारची आणि बॅगची झडती घेतली असता पोलिसांना 100 ग्रॅम अवैध कोकेन मिळाले. या कोकेनची बाजारात लाखो रुपये किंमत आहे.


पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पामेला गोस्वामी अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असल्याबाबत माहिती मिळाली होती. आम्हाला माहिती मिळाली होती की, ती आपला साथीदार प्रोबीरसोबत अमली पदार्थाचा व्यवहार करण्यासाठी येत आहे.


त्यांनी सांगितलं की, आठ वाहनांच्या तुकडीनं गोस्वामीच्या कारला घेराव घालत तिला अटक केलं. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या मागे मोठी टोळी कार्यरत तर नाही ना? याची चौकशी सुरु आहे.


भाजपनं म्हटलं आहे की, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. गोस्वामी चुकीच्या असतील तर कायदेशीर कारवाई केली जाईल. भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांनी सांगितलं की, राज्यातील पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रकरणी काही भाजप कार्यकर्त्यांची नावं घुसवली आहेत. या प्रकरणाची मला अधिक माहिती नाही, त्यामुळं आताच यावर भाष्य करणार नाही, असं चटर्जी म्हणाले.