मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj ) यांनी काही दिवसांसाठी सोशल मीडियावरून विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले आहे. ट्विट करून कंबोज यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोशल मीडियावरून थोड्या दिवसांसाठी आपण विश्रांती घेत असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. Mission Completed today, म्हणजेच माझी मोहीम आज पूर्ण झाली असं कंबोज यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावरून विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले आहे.
"गेल्या काही महिन्यांमधील अनुभव खूपच रोमांचक होता. या दिवसांमध्ये मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शिवाय मी देखील अनेकांना काही गोष्टी शिकवल्या. काही जुने लोक दूर गेले तर काही नव्या लोकांची जवळीक झाली. आता थोडी विश्रांती घेण्याची वेळ आहे. मी काही दिवसांसाठी सोशल मीडियावरू विश्रांती घेत आहे. या कालावधील माझी सर्व सोशल मीडियाची अकाऊंट्स बंद असतील. परंतु, मित्रांसाठी घराचा दरवाजा कायम उघडा असेल, असे शेवटचे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
कंबोज यांनी सोशल मीडियावरून विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले असले तरी सध्या त्यांच्या शेवटच्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. कारण त्यांनी सोशल मीडियावरून विश्रांती घेत असल्याचे जाहीर करण्यासाठी जे ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी अनेक सूचक टिप्पणी केली आहे. अनेकांना काही गोष्टी शिकवल्या असे कंबोज यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय पांडे यांना अटक केल्यानंतर केलेले ट्विट आणि आताच्या ट्विटमधून ते नक्की कोणाला इशारा देण्याचा प्रयत्न करत आहेत? याबाबत सध्या तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ही कारवाई सुडबुद्धीने झाली, असा आरोप त्यांनी केला होता. शिवाय कंबोज यांनी संजय पांडे यांना थेट आव्हान दिले होते. पुढचे काही दिवसांमध्ये एका मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडेल असा दावा कंबोज यांनी केला होता.