देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे.
आज सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांना झोपूनच राहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती काहीशी सुधारली होती. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
14 फेब्रुवारी 2018 पासून मनोहर पर्रिकर आजारी होते. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले होते. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 3 मार्च 2018 रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. तिथून ते 14 जून रोजी परतले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांना अमेरिकेला उपचारांसाठी नेण्यात आले होते. तिथून ते 22 ऑगस्ट रोजी परतले होते. त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन 15 सप्टेंबर रोजी ते परतले होते. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या 2 जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले होते. 27 जानेवारी रोजी तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रावरुन विरोधकांसह अनेकांनी त्यांनी आता विश्रांती घ्यावी असे सल्ले दिले होते.
गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
- संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
- गोव्यातल्या म्हापसामध्ये जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म
- लोलोला हाय स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण
- मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण
(पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि परिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले) - विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत
- 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले
- 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
- त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले
- जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
- 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
- पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं
- 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली.
- पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
- गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
- 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- 2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले