Pandurang Madkaikar : भाजप नेते आणि गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्याच सरकारवर आरोप केले आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याच्या पीएला त्यांची फाईल पास करण्यासाठी सुमारे 20 लाख रुपयांची लाच दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त असल्याचा आरोप पांडुरंग मडकईकर यांनी केला. भाजपच्या एका नेत्याने आपल्याच सरकारवर केलेल्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मडकईकर यांच्या दाव्याला उत्तर देताना राज्याचे परिवहन मंत्री आणि भाजप नेते मौविन गोडिन्हो यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, मडकईकर यांनी पोलिस तक्रार करावी आणि त्यांनी कोणाच्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले याचे नाव उघड करावे.


मडकईकर यांच्या दाव्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवावा


विरोधी आम आदमी पक्षाने (आप) देखील मडकईकर यांच्या दाव्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मागील मंत्रिमंडळात मंत्री असलेले मडकईकर यांनी मंगळवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांची गोव्यात भेट घेतली. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेदरम्यान संतोष यांनी मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली.


मंत्रिमंडळातील मंत्री ‘पैसे मोजण्यात व्यस्त’ 


पत्रकारांशी बोलताना मडकईकर यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील मंत्री ‘पैसे मोजण्यात व्यस्त’ असल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, "मी हे बोलतोय कारण मी स्वतः एका मंत्र्याच्या पीएला माझी फाईल पास करण्यासाठी 15-20 लाख रुपये दिले होते." त्यांच्या दाव्याला उत्तर देताना, गोदिन्हो म्हणाले की मडकईकर यांनी "तक्रार नोंदवावी आणि त्यांनी ज्या मंत्र्याला पैसे दिले त्यांचे नाव उघड करावे. मंत्री मौविन गोडिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले की, लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ते म्हणाले की, "मला कशावरही भाष्य करायचे नाही. सर्वजण त्यांना चांगले ओळखतात. त्यांच्या कार्यकाळात काय झाले ते पाहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आत डोकावले पाहिजे." "माझा त्यांना सल्ला आहे की जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये."


दरम्यान, आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पणजी पोलिसांनी मडकईकर यांच्या वक्तव्याची दखल घेऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. माजी मंत्र्याने एका मंत्र्याच्या पीएला किती लाच दिली, याची माहिती पोलिसांनी घ्यावी, असे पालेकर म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या