नवी दिल्ली : भाजपची दोन दिवसीय कार्यकारिणी दिल्लीत सुरु आहे. बैठकीत 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर धोरण आखलं जाणार आहे. बैठकीत संघटनात्मक बदलावरही निर्णय घेण्यात आला. भाजपने संघटनात्मक निवडणुका एका वर्षासाठी टाळल्या आहेत.

2019 ची निवडणूक विद्यमान भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याच नेतृत्त्वात लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शाह जानेवारी 2019 नंतरही पक्षाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. त्यांचा भाजपाध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ जानेवारी 2019 मध्ये पूर्ण होत आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीपूर्वी अमित शाहांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. आपल्याला यावेळी 2014 पेक्षा जास्त बहुमताने निवडून यायचं असून जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी आपल्याकडे आहेत, असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तीन राज्यांच्या (छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान) विधानसभा निवडणुकांसोबतच तेलंगणावर विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. कारण, इंधनाच्या भडकलेल्या किंमती, रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण आणि वाढलेली महागाई या सगळ्या मुद्द्यावर भाजपला देशभरात विरोधाचा सामना करावा लागत असताना या बैठकीला महत्त्व आहे.