India Politics: भाजपमध्ये प्रवेश केला की काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात असल्याचं दिसून येतंय. भाजपने शुक्रवारी माजी काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. शेरगिल यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.  जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे जयवीर शेरगिल यांनी ट्विटरवर म्हटले आहे.


 काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना महत्वाची जबाबदारी


याआधीही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना महत्वाची जबाबदारी दिल्याचं आपण राष्ट्रीय स्तरावर पाहिलं आहे. आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड तसेच उत्तर प्रदेशचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तराखंडचे बडे नेते मदन कौशिक, छत्तीसगडचे विष्णू देव साई, पंजाबमधील राणा गुरमित सिंग सोढी, मनोरंजन कालिया आणि अमनजोत कौर रामूवालिया या तिघांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित करण्यात आले आहे, असं भाजपनं एका निवेदनात म्हटले आहे.






 






याआधी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले जयवीर शेरगिल यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता. संघटनेला कीड लागली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस हा पंजाबचा इतिहास होता, आप सध्या आहे पण भाजप हे पंजाबचे भविष्य आहे. काँग्रेसने टोकाच्या डाव्या विचारसरणीचा स्वीकार केला आहे. देश भाजपसोबत आहे आणि प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असं जयवीर शेरगिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटलं आहे.






आजपासून मी काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाकडून सकारात्मक विकासाच्या राजकारणाकडे, पदाच्या राजकारणाकडून देशसेवेच्या राजकारणाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, 'चमचागिरी'कडून 'कर्तव्य'कडे जात आहे, असंही जयवीर शेरगिल यांनी म्हटलं आहे.