नवी दिल्ली : केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने आता भाजपचं नेतृत्त्व असलेल्या एनडीएलाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पार्टीच्या पॉलिट ब्यूरोची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्राबाबूंनी नवी दिल्लीत आपल्या खासदारांशी संपर्क साधून तशा सूचना दिल्या आहेत. पक्षाकडून लवकरच याबाबतची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
मोदी सरकारविरोधात आज YSR अविश्वास प्रस्ताव आणणार
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत सरकार गंभीर नाही, असं सांगत टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे देत सरकारमधून बाहेर पडून मोदींना थेट आव्हान दिलं. आता एनडीएलाही रामराम ठोकून भाजपसोबतचे उरलेसुरले संबंध तोडण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे. टीडीपीने पत्र लिहून आपला निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कळवला आहे.
चंद्राबाबूंचा टीडीपी एनडीएतून बाहेर
सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला टीडीपीचा पाठिंबा
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर वायएसआर काँग्रेस आज (शुक्रवारी) संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. या अविश्वास ठरावाला समर्थन देण्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. या अविश्वास प्रस्तावाबाबत वायएसआर काँग्रेसला टीडीपीसह इतर विरोधी पक्षांचंही समर्थन मिळू शकतं.
शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच टीडीपी एनडीएतून बाहेर: संजय राऊत
भाजपला आणखी एक झटका
तीन जागांच्या लोकसभा पोटनिवडणुकीनंतर भाजपसाठी हा आणखी एक झटका समजला जात आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा दिला, तर बिहार, झारखंड आणि ओदिशासह इतर राज्यही अशी मागणी करु शकतात, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारमध्ये सामील आपल्या तीन मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर याला उत्तर म्हणून आंध्र प्रदेश सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे सोपवले होते.