नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपतींचं अभिभाषण, सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल असे सगळे सोपस्कार या पहिल्या दिवशी पार पडले. पण राजकीयदृष्टया सगळ्यात महत्वाची घडामोड घडली ती ‘6 जनपथ’ या शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी. देशातल्या अनेक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची ही खलबतं ही जवळपास तासभर सुरु होती.


काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, नॅशनल काँन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, जेडीयूतून नुकतेच बाहेर पडलेले शरद यादव, माकपचे टी के रंगराजन, भाकपचे डी राजा यासह राष्ट्रवादीचे प्रमुख राष्ट्रीय नेते या बैठकीला उपस्थित होते.

मुंबईत नुकतीच जी ‘संविधान बचाव’ रॅली पार पडली, त्याचा पुढचा टप्पा म्हणून या बैठकीकडे पाहिलं जातंय. या बैठकीनंतर पुढच्या आठवड्यातच काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची अजून एक बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.

बजेट अधिवेशनाच्या सुरुवातीला काही मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती असं पटेल यांनी सांगितलं असलं तरी 2019 साठी भाजपविरोधात महामोर्चा उभा करण्याच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झालीय का, अशी चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय.

आजच्या या बैठकीला सपा, बसपा, राजद आणि तृणमूल काँग्रेस यांची हजेरी नव्हती. मात्र मुंबईतल्या रॅलीला यातल्या सपा, तृणमूल काँग्रेसनं आवर्जून उपस्थिती दर्शवलेली होती.

विरोधकांच्या एकीत पवारांच्या पुढाकाराचं काय कारण?

एरव्ही दिल्लीत चर्चा मोदी-पवारांच्या मधुर संबंधाची होत असते. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजपविरोधी राहिलेली असली तरी राष्ट्रीय पातळीवर या विरोधाची धार कमी होताना दिसते. असं असताना दिल्लीत विरोधकांच्या एकीसाठी पवारांनी पुढाकार घ्यावी याची खमंग चर्चा सुरु आहे.

सोनिया गांधी अॅक्टिव्ह रोलमध्ये दिसणार तर..

विरोधकांची पुढच्या आठवडयातली बैठक ही सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होतेय, हे आज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी काय करणार या प्रश्नाचं उत्तरही मिळालं. यापुढेही त्या सक्रीय राजकारणात असतील हेच यातून दिसतंय.

आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली होती. एरव्ही पवारांची केमिस्ट्री काँग्रेसच्या या नव्या पिढीशी फारशी जुळत नाही. मात्र आज त्यांनी राहुल गांधींना बोलावून त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा सगळ्यांच्या भुवया उंचावणाऱ्या होत्या.