Shivraj Patil Chakurkar : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil Chakurkar) यांनी गीतेची तुलना जिहादशी केल्यानंतर त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपने सडकूड टीका केली आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं त्या पक्षाच्या नेत्याकडून आणखी काय अपेक्षा करणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवराज पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे असंही ते म्हणाले.
मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादसोबत केली. त्यावर आता अनेकांनी टीका केली.
शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं, भाजपची टीका
भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, "शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन केलं, दहशतवादी आणि नक्षलवादी यांचं समर्थन केलं, त्या पक्षाचे नेते शिवराज पाटील यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? त्यांचं डोकं सडलेलं आहे आहे. काँग्रेसची विचारसरणीच सडलेली आहे."
काँग्रेसचं प्रत्युत्तर
शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, "जिहाद म्हणजे स्वत: मध्ये बदल घडवणे असा आहे, नंतरच्या काळात त्याचा अर्थ वेगळा सांगण्याचा प्रयत्न केला गेला. खरा धर्म काय आहे ते पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे शिवराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यात काही चुकीचं वाटत नाही."
काय म्हणाले शिवराज पाटील?
शिवराज पाटील यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. ते म्हणाले की, "मनामध्ये कोणतीही संशय नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे."
संबंधित बातमी :