नवी दिल्ली : देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपला 212 जागा मिळतील, असा अंदाज खासदार आणि आमदारांचं कामचं रिपोर्ट कार्ड देणाऱ्या 'नेता' अॅपने व्यक्त केला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या अॅपचं उद्घाटन झालं.
प्रथम मित्तल यांनी या अॅपची निर्मिती केली आहे. यावेळी मित्तल म्हणाले की, आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजप 212 जागा जिंकेल. तर काँग्रेसला 110 जागा मिळतील. मात्र हे ट्रेंड बदलत असतात. सध्याचा ट्रेंड थोडा सत्ताधाऱ्यांविरोधात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास राजस्थानात भाजपला 2-3 जागा अधिक मिळू शकतात, तर मध्य प्रदेशात अटीतटीचा सामना होऊ शकतो.
"नेता अॅपवर नागरिकांना आमदार, खासदार यांच्या कामकाजाचं रेटिंग देण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांनाही आपल्या कामाच्या आधारावर जनता त्यांना काय रेटिंग देतं हे कळतं. त्यामुळे चांगल्या रेटिंगसाठी नेत्यांना रोज काम करावं लागले", असं प्रथम मित्तल यांनी सांगितलं.
नेता अॅप अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र काल या अॅपचं औपचारिकरित्या लॉन्चिंग करण्यात आलं. लॉन्चनंतर अॅपचे 10 लाख युजर्स वाढल्याचं प्रथम मित्तल यांनी सांगितलं. अॅपचा दुरुपयोग होऊ नये आणि रेटिंगमध्ये काही फेरफार होऊ नये म्हणून अनेक सेफगार्ड लावण्यात आले आहेत. व्यक्तीची ओळख आणि मतदान पडताळणी केल्यानंतरच त्या व्यक्तीला अॅपवर रेटिंग देता येणार आहे, अशी माहिती मित्तल यांनी दिली.
काय आहे 'नेता' अॅप?
आमदार आणि खासदार यांच्या कामाचा रिपोर्ट आता मोबाईल अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. नागरिकांच्या रेटिंगच्या आधारावर 'नेता' अॅपच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या कामाचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे.