मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेही मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदारही सहभागी होणार आहेत.


राष्ट्रपती भवनपर्यंतच्या या मोर्चात शिवसेना सामील होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात शिवसेना खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. परंतु काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार नाही.

मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी फोनवरुन चर्चा केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीविरोधात विरोधकांच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. काळा पैशांवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मोदींनी सांगितलं.

परंतु विरोधकांनी मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. विशेष म्हणजे शिवसेना वगळता एनडीएच्या सगळ्या घटकपक्षांनी पंतप्रधान मोदींनी काळ्या पैशांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं.

नोटाबंदीमुळे सामन्यांच्या अडचणीत वाढ : शिवसेना

आम्ही काळ्या पैसा नष्ट करण्याच्या विरोधात नाही. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला सरकारने दोन-तीन दिवस अडचणी कमी होतील, असं म्हटलं होतं. पण आता पंतप्रधान 50 दिवस सहकार्य करण्याची विनंती करत आहेत,

'मोदींना पवार चालतात, मग सेनेला ममता बॅनर्जी का नाही? '

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. “आम्ही मोदींच्या विरोधात नाही, मात्र हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.