Sanjay Nishad on Lord Ram : उत्तर प्रदेशमधील भाजपच्या आघाडीतील निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर संजय निषाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्रीराम हे राजा दशरथ यांचे पुत्र नव्हते. तर, पुत्रेष्टि यज्ञ करणारे श्रृंगी ऋषी यांचे सुपुत्र होते असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. राजा दशरथ यांना प्रभू श्रीराम यांचे तथाकथित पुत्र म्हटले जाऊ शकते. मात्र, ते त्यांचे खरे वडिल नव्हते असे तारे निषाद यांनी तोडले. निषाद यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपवरही जोरदार टीका केली. टीकेनंतर उपरती झालेल्या निषाद यांनी वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. 


संजय निषाद यांनी म्हटले की, राजा दशरथ यांना मुल होत नव्हते तेव्हा त्यांनी श्रृंगी ऋषी यांच्याकडून यज्ञ केला. हा यज्ञ फक्त सांगण्यापुरता होता. श्रृंगी ऋषी यांनी दिलेल्या खीरमुळे राजा दशरथ यांच्या तिन्ही पत्नींना पुत्ररत्नाचा लाभ झाला,असे म्हटले जाते. मात्र, खीर खाल्यामुळे कोणत्याही स्त्रीची गर्भधारणा होऊ शकत नाही. 


संजय निषाद यांनी यापुढे वक्तव्य करताना म्हटले की, राजा दशरथ आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी प्रभू राम यांना फक्त राजकुमार समजत होते. प्रभू राम यांच्या रुपाने ईश्वरच स्वत: अवतरले आहेत, असे कोणालाही माहिती नव्हते. राम हे ईश्वर आहेत, हे समजण्याची क्षमता फक्त निषाद राजामध्ये होती असेही त्यांनी म्हटले. जो ईश्वराला ओळखू शकतो तो ईश्वरापेक्षाही मोठा असतो असेही संजय निषाद यांनी म्हटले. 


अयोध्येतील संत संतापले


संजय निषाद यांनी केलेल्या वक्तव्यावर अयोध्येतील संतसाधू मंडळींनी संताप व्यक्त केला. चर्चेत राहण्यासाठी संजय निषाद यांनी देवाची निंदा करणारे वक्तव्य केले असल्याचे त्यांनी म्हटले. निषाद यांचे वक्तव्य आणि वापरलेली भाषा आक्षेपार्ह असल्याचे  श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले. 


निषाद यांची दिलगिरी


आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होत असल्याचे पाहून संजय निषाद यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपले वक्तव्य चुकीच्या संदर्भाने वापराने मांडले जात असल्याचे निषाद यांनी म्हटले. आपण प्रभू श्रीराम यांचे गुण आणि महानता यांचा गौरक करत होतो असे वक्तव्य त्यांनी केले.