नवी दिल्ली: पासपोर्टबाबत सरकार एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. संसदेत याबाबत माहिती देताना सरकारनं स्पष्ट केलं की, यापुढे पासपोर्टसाठी जन्म दाखल्याची आवश्यकता नाही.

जन्म तारखेसाठी जन्म दाखल्याऐवजी आता पॅनकार्ड किंवा आधारकार्ड हे देखील वैध समजलं जाईल. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना बऱ्याच फायदा होणार आहे.

पासपोर्ट नियम 1980नुसार 26.01.1989 नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना पासपोर्टसाठी जन्माचा दाखला देणं अनिवार्य होतं. पण यापुढे त्यांना हा नियम लागू होणार नाही. ते जन्म तारखेसाठी शाळेचा दाखला, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बॉण्ड या कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागदपत्र सादर करु शकतात.

तर सरकारी कर्मचारी हे सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड हे देखील सादर करु शकतात. संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

देशातील नागरिकांना सहजपणे पासपोर्ट उपलब्ध व्हावा यासाठी नियमात काही बदल करण्यात आल्याचं व्ही के सिंह यांनी सांगितलं.