दीव : समुद्र किनारे, पूल, डोंगर-दऱ्या यासारख्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये, असं आवाहन पोलिस-प्रशासनाने वारंवार करुनही अनेक पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. दीवमध्ये समुद्र किनारी सेल्फी घेताना उसळलेल्या 25 फूट उंच लाटेमुळे तीन तरुण समुद्रात बेपत्ता झाले.

गुजरातजवळ दीवमधल्या कोडियार बीचवर रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. समुद्रात 20-25 फूट उंच लाटा उसळत असताना चार युवक खडकावर बसून सेल्फी घेत होते. त्याचवेळी आलेल्या एका उंच लाटेनं चौघांना गिळंकृत केलं. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं, तर तिघे समुद्रात बेपत्ता झाले.

घटनेच्या केवळ काही सेकंद आधी या चौघांची मजामस्ती सुरु असतानाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. त्यांच्या पाचव्या मित्राने काही अंतरावरुन हा व्हिडिओ घेतला. बेभान लाटांचं थैमान सुरु असतानाही चौघं जण जीव धोक्यात घालून सेल्फी घेत असल्याचं यात दिसत आहे. तितक्यात आलेल्या एका 25 फूट उंच लाटेने चौघांना खेचून नेलं. तिघं समुद्रात बेपत्ता झाले, तर एकाने खडक घट्ट धरल्याने तो बचावला.

दीव अग्निशमल दल या तरुणांना वाचवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालं, मात्र समु्द्राला उधाण आल्यामुळे त्यांचे प्रयत्नी अयशस्वी ठरले. तिघंही तरुण राजस्थानचे रहिवासी होते.

खरं तर या ठिकाणी पर्यटकांना बंदी असल्याची माहिती दीवचे जिल्हाधिकारी पीएस जानी यांनी दिली. मात्र मान्सूनमध्ये उसळणाऱ्या उंच लाटांमध्ये भिजण्यासाठी काही पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाने वारंवार आवाहन करुनही हे प्रकार थांबले नाहीत.