पाटणा : रस्त्यातून जात असताना केवळ आपल्या गाडीला साईड दिली नाही म्हणून आमदाराच्या मुलाने आणि अंगरक्षकाने एका विद्यार्थ्याची गोळी मारुन हत्या केल्याचा आरोप होत आहे. बिहारमध्ये घडलेल्या या घटनेने तीव्र संताप व्यक्त केलं जात आहे.


 
बिहार विधानपरिषदेतील जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी आणि अंगरक्षक यांनी  ही हत्या केल्याचं समोर येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचं नाव आदित्य असून तो बारावीत शिकत होता. आदित्य श्रीवास्तव हा एका बिझनेसमनचा मुलगा होता.

घटनेच्या वेळी आदित्य आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरुन गाडीने परत येत होता. याचवेळी आमदरांची गाडी त्याच मार्गाने जात होती. यावेळी हॉर्न देऊनही आपल्याला साईड न दिल्याने रागावलेल्या अंगरक्षकाने आदित्य आणि त्याच्या मित्रांना थांबवून मारहाण केली.

 
यानंतर केलेल्या गोळीबारात एक गोळी आदित्यच्या डोक्यात लागली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अारोपी रॉकीचे वडील बिंदी यादव यांनी हे आरोप नाकारले आहेत. आदित्य आणि त्याच्या मित्रांनी आपल्या मुलाची गाडी अडवून त्याला मारहाण केली. मात्र स्वतःच्या बचावासाठी त्याने चुकून गोळी झाडली आणि आदित्यचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे.

 

या घटनेनंतर पोलिसांनी आमदाराची गाडी ताब्यात घेतली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.