पाटणा: बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची (NDA) युती तोडल्याचं जाहीर केलं आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा दिला. 


नितीश कुमार यांनी भाजपला (BJP) दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.


बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे. 


एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिल्याचं सांगितलं जातंय. भाजप-जेडीयू सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, तोपर्यंत हे सरकार पडलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. आता हा वाद शिगेला पोहोचला असून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. 


नितीश कुमार यांनी या आधीही भाजपसोबत युती तोडली होती. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं. त्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. 


बिहारमध्ये आता नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा राजद एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील तर तेजस्वी यादव यांनी गृहमंत्रीपद त्यांच्या पक्षाकडे राहावं यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे. 


महाराष्ट्रात एकीकडे भाजप आघाडीचे सरकार सत्तेत येत असताना दुसरीकडे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शिवसेना हे भाजपचे जुने सहकारी आहेत. पण सध्या या दोन्ही पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे.