Bihar BJP JDU Alliance End : बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एनडीएसोबतची (NDA) युती तोडली आहे. नितीश कुमार यांनी भाजपला (BJP) दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज सायंकाळी चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली होती. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप
एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच तिकडे बिहारमध्येही देखील राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधींशी (Sonia Gandhi) चर्चा केल्यानं एनडीएमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं बोललं जात होते. त्यातच नितीशकुमार यांनी जेडीयूचे आमदार आणि खासदारांची पाटण्यात आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यानुसार आज बैठक झाली. बैठकीनंतर एनडीएसोबत असणारी युती जेडीयूने तोडली आहे. तत्पूर्वी काल जेडीयूचे (JDU) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आरसीपी सिंह यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे. राजीनाम्यानंतर आरसीपी सिंह (RP Singh) यांनी पक्षाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमधील संघर्ष का वाढला?
हार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्यावर नाराजी
बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांना हटवावं, अशी नितीश यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सिन्हा यांच्याबाबतची खदखद अनेकदा व्यक्त केली आहे. सिन्हा यांनी उघडपणे आपल्या सरकारवर प्रश्न उपस्थित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप नितीशकुमार यांनी वारंवार केला आहे.
केंद्र सरकारमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही
जून 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारमध्ये जेडीयूला एकच पद ऑफर करण्यात आल्यानंतर नितीशकुमार भाजपवर नाराज झाले होते. बिहारच्या विस्तारित मंत्रिमंडळात त्यांनी पक्षाच्या आठ सहकाऱ्यांचा समावेश करून त्याचा बदला घेतला होता. आणि फक्त एक जागा भाजपसाठी रिकामी ठेवली होती.
राज्य आणि केंद्रात एकाचवेळी निवडणुका
जेडीयू प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विरोधात आहेत. राज्य आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना पीएम मोदींनी दिली आहे, ज्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे.
भाजपच्या मंत्र्यांच्या निवडीवरुन नितीश नाराज
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील भाजप मंत्र्यांच्या निवडीत हस्तक्षेप करायचा आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असं झाल्यास, या निर्णयामुळे गृहमंत्री अमित शहा यांची बिहारवरील पकड कमकुवत होऊ शकते. अमित शाह यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना मंत्री म्हणून नियुक्त करून राज्य नियंत्रित केलं असल्याच्या चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.