पाटणा: येत्या लोकसभेच्या निवडणुकीतल देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तसेच या बैठकीत दिल्लीतील अध्यादेशावर काँग्रेसने राज्यसभेत आपच्या बाजूने समर्थन द्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे. 


मोदी हुकूमशाहप्रमाणे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ते म्हणाले की, भारताच्या मूलभूत विचारांवर आक्रमण केलं जात आहे, भारताच्या मूलभूत संस्थांवर हल्ले केले जात आहेत. ही विचारांची लढाई आहे. आमच्यातही काही मतभेद असतील पण सर्वांना एकत्रित करुन, सर्वांचे विचार घेऊन आम्ही एकत्रित जाणार आहोत. 


बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटण्यातून जी आंदोलनं सुरू झाली ती नंतर मोठी झाली हा इतिहास आहे. त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही एकत्रित लढणार आहोत, आम्हीही देशभक्त आहोत, पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. कुणी सरकारच्या विरोधात बोललं तर त्याच्याविरोधात ईडी, सीबीआय लावली जाते. पण देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांवर काहीही बोललं जात नाही. जय 2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आलं तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत हे नक्की. 


भाजपला इतिहास संपवायचा आहे, पण आम्हाला इतिहास सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आम्ही लढत राहू असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर एकत्र येऊन सामना करायला हवा. जे वाद होते ते बाजूला सामोरे ठेऊन आम्ही पूढे जात आहोत. जयप्रकाश यांच्या नेतृत्वात पाटण्यातून सूरू झालेलं आंदोलन देशात पोहचलं होतं. आता देखील हेच होताना पाहायला मिळेल. 


जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आता देशभरात आहे असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. गांधी-नेहरूंच्या विचाराच्या या देशाला वाचवण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या. 


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची मत मतांतरे असतील, परंतु देश एक आहे. स्वातंत्र्यावर जो आघात करेल त्याला आम्ही मिळून त्याला विरोध करू. जे देशात तनाशाही आणायचं प्रयत्न करतील त्यांना आम्ही विरोध करत राहू. आता सातत्यानं बैठका होताना पाहिला मिळतील.


विरोधी पक्षनेत्यांची पुढची बैठक ही शिमल्यात होणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी ती 12 किंवा 13 जुलै असल्याचं सांगितलं जातंय. निवडणूक लढवण्यासाठी किमान समान कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.