पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यूपीएससीच्या नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींचं मनोबल वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. बिहार सरकारकडून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील यूपीएससी आणि बीपीएससी (बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन) या परीक्षांची पूर्व परीक्षा पास होणाऱ्या परीक्षार्थींना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.


मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नितीश कुमार यांनी या निर्णय घेतला. यानुसार बीपीएससी क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना 50 हजार रुपये, तर यूपीएससी क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे.

''अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण व्यवस्था देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना मदत केली जाईल. पूर्व परीक्षा क्लिअर करणाऱ्या परीक्षार्थींना ही मदत केली जाईल, ज्यामुळे कोणतीही चिंता न करता ते मुख्य परीक्षेची तयारी करतील,'' अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली.

बिहार सरकारने या योजनेचं नाव 'अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती' योजना असं ठेवलं आहे. याशिवाय बिहार सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये प्रति महिना अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा केली आहे.