पाटणा : कोरोना काळात पार पडलेल्या सर्वात मोठ्या निवडणुकां संपूर्ण देशभरात चर्चेत राहिल्या. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बिहारच्या जनतेनं एनडीएच्या बाजूनं कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच संपूर्ण निवडणुकीत चर्चेत असलेले आरजेडीचे तरूण नेते तेजस्वी यादव मात्र निवडणुकांच्या निकालांनंतर शांत होते. परंतु, आता त्यांनी बिहार निवडणुकांच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी बिहारच्या जनतेचे आभारही मानले आहेत.


बिहार निवडणुकांच्या निकालासंदर्भात बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, "जनतेचा आदेश महागठबंधनाच्याच बाजूने होता. परंतु, निवडणूक आयोगाचा निकाल मात्र एनडीएच्या बाजून आला. हे पहिल्यांदाच नाही झालं. 2015 मध्ये जेव्हा महागठबंधन झालं होतं. तेव्हा मतं आमच्याच बाजूने होती. परंतु, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला."


आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आरोप लावला आहे की, "आम्हाला लोकांचं समर्थन मिळालं, पण एनडीएने पैसे, भीती आणि बळाच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळवला आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "नीतिश कुमार यांचा जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांच्यात थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा लोभ सोडायला हवा."


तसेच तेजस्वी यादव यांनी निवडणुक आयोगाकडे मागणी केली आहे की, "पोस्टल मतांची पुन्हा मतमोजणी करण्यात यावी. पोस्टल मतांची गणना सर्वात शेवटी करण्यात आली होती. जी सामन्यतः सुरुवातीला करण्यात येते."


पाहा व्हिडीओ : बिहारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा फुसका बार का निघाला?



दरम्यान, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015 मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 74 जागा मिळाल्या आहेत. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे.


कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?


एनडीए-125
भाजप-74
जेडीयू-43
विकासशील इंसान पार्टी-04
हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04


महागठबंधन-110
आरजेडी-75
काँग्रेस-19
भाकपा-माले-12
सीपीएम-02
सीपीआय-02


एएमआयएम - 5
बहुजन समाज पार्टी - एक
लोक जनशक्ति पार्टी - एक
अपक्ष - एक


 महत्त्वाच्या इतर बातम्या :