पटना: बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. त्यामध्ये त्यांनी एनडीएचे सरकार सत्तेत आले तर बिहारच्या जनतेला मोफत कोरोनाची लस देणार असल्याचं सांगितलंय. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली असून कोरोनाची लस ही पूर्ण देशाची आहे, त्यावर भाजपचा कोणताही अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


तेजस्वी यादव म्हणाले की, "बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडे कोणताही चेहरा नाही त्यामुळेच केद्रीय अर्थमंत्र्यांकडून हा जाहीरनामा घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारा की बिहारला सव्वा करोड रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे ते कसे आणि कधी येणार. त्यांना विचारा की बिहारला विशेष राज्याचा दर्जा का नाही मिळत. असा दर्जा मिळेल काय?"

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाटण्यात बिहारच्या निवडणूकीचा जाहीरनामा भाजप अध्यक्ष संजय जायस्वाल यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत घोषित केला आहे. या जाहीरनाम्यात 'भाजप है तो भरोसा है' या नाऱ्यासह पाच सुत्र, एक लक्ष आणि 11 संकल्प यांना स्थान देत आत्मनिर्भर बिहारचा निर्धार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात बिहारी जनतेला कोरोना लसीचे मोफत वाटपाचेही आश्वासन देण्यात आले आहे. भाजपने निवडणुकीसाठी 11 मोठे संकल्प केले असून सत्तेत आल्यानंतर ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा दावाही केला आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणूकीतील पहिला टप्प्यातील 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी तर तिसऱ्या टप्प्यातील 78 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

नुकत्याच एका अंदाजानुसार बिहार निवडणूकीत एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात जबरदस्त चुरस असल्याचे सांगण्यात आले आहे.

बिहार निवडणूकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या प्रत्येकी 12 सभा होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत असलेले अमित शाह पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत.

 संबंधीत बातम्या:


Bihar Elections 2020 | 'आत्मनिर्भर बिहार'साठी भाजपचा जाहीरनामा; सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन!