नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या रणांगणात आज पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आमने-सामने असणार आहेत. दोन्ही नेते आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात आज एकाच दिवशी करत आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता बिहारमधल्या सासाराम इथे प्रचार सभेला संबोधित करतील. कोरोना काळात त्यांची ही पहिली जाहीर सभा असेल. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची एकत्रित सभा ही उद्याच होणार आहे.


भाजपने गुरुवारी आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक बिहारवासियांना मोफत कोरोना लसीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आजच्या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या स्वतंत्र लढण्यावरून खूप वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यांना आतून भाजपचा पाठिंबा आहे का अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याही बाबतीत मोदी पक्षाची भूमिका स्पष्ट करणार का? नितिशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे पुन्हा ठणकावून सांगणार का हे पाहावं लागेल.


बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होतंय तर तीन आणि आणि सात नोव्हेंबर असे एकूण तीन टप्पे आहेत. 10 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. बिहारच्या या निवडणुकीत बेरोजगारीचा देखील मुद्दा चर्चेत आहे तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिल्यानंतर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 19 लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे. पंतप्रधान मोदी बिहारच्या रणधुमाळीत एकूण बारा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. उद्या राहुल विरुद्ध मोदी या लढाईने या रणधुमाळीची सुरुवात कशी होते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.


अमित शाहांची प्रकृती हा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात कुजबुजीनं चर्चिला जाणारा विषय. पण याबाबतच्या सगळ्या शंका कुशंकांना मागे टाकत अमित शाह भाजपच्या मिशन बिहारसाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्या किमान 12 रॅली होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही रॅली व्हर्चअुल असतील, पण किमान 9 रॅली ते प्रत्यक्षपणे संबोधित करतील असं सांगितलं जातंय.


Bihar Election 2020 | बिहारमध्ये कोरोना लसीचा डोस मोफत; बिहार निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध