CM Nitish Kumar meets Delhi CM Arvind Kejriwal: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या तयारीला वेग आला आहे. याच रणनीतीचा भाग असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (21 मे) रविवारी राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीमधील प्रशासकीय बदल्यांचे हक्क सुप्रीम कोर्टाने देऊनही मोदी सरकारने अध्यादेश आणून निर्णय फिरवला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अध्यादेशाविरोधात नितीशकुमार यांच्याकडे समर्थन मागितले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीतून विरोधी ऐक्याची ताकद दिसून आली. या बैठकीला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्यावर चर्चा करण्यात आली.
अध्यादेशावर काय म्हणाले केजरीवाल?
दिल्लीत NCCSA स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "ममताजी (बंगालचे मुख्यमंत्री) यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर मी देशातील सर्व पक्षाध्यक्षांना भेटायला जाईन. आज मी देखील नितीशजींना सर्व पक्षांशी बोलण्याची विनंती केली. राज्यसभेत जेव्हा हे विधेयक येईल, तेव्हा मी प्रत्येक राज्यात जाईन आणि समर्थनासाठी सर्वांशी बोलेन.
आम्ही केजरीवाल यांच्यासोबत
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य होता, पण असे असतानाही केंद्र सरकार जे काही करण्याचा प्रयत्न करत आहे ते विचित्र आहे. सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. आम्ही केजरीवाल यांच्या सोबत आहोत. अधिकाधिक विरोधी पक्षांना एकत्र अभियान राबवावं लागेल. आम्ही पूर्णपणे केजरीवाल यांच्यासोबत आहोत.
भाजप कधीही दिल्लीत परतणार नाही
त्याचवेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्याविरोधात आम्ही केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. दिल्लीत भाजपचे सरकार असते तर उपराज्यपालांना असे काम करण्याची हिंमत असती का? भाजप दिल्लीत परत येणार नाही.
इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही भेट होऊ शकते
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी बंगळूरहून दिल्लीत पोहोचले. विरोधकांच्या ऐक्याबाबत नितीशकुमार आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे.कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधी एकजुटीच्या पुढाकाराचे जोरदार कौतुक करण्यात आले होते. नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव शनिवारीच पाटणा येथून शपथविधी सोहळ्याला पोहोचले होते. सोहळ्यात राहुल गांधी आणि प्रियाका यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधींच्या जवळ उभे असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीशकुमार यांना त्यांच्या शेजारी बसवले. नितीश कुमार यांची व्यासपीठावर राहुल गांधींच्या जवळ बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या विरोधी एकजुटीच्या पुढाकाराची चर्चा झाली. त्यामुळे पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीची संयुक्तपणे तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या