2000 Rs Note Exchange: भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नक्की कशा प्रकारे या नोटा बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच या संदर्भातली नियमावली वेळोवेळी बँकांकडून देखील जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं एसबीआयनं सांगितलं आहे. एसबीआयकडून आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आहे. स्टेट बॅंकेसोबतच इतर बँका देखील या नियमाचे पालन करतील अशी माहिती आता मिळत आहे. दोव हजारांच्या नोटा बदलून देताना एक फॉर्म जारी करत माहिती भरुन द्यावी लागणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र या पत्रानंतर यावर आता स्पष्टीकरण मिळाले आहे.
मंगळवारपासून बदलता येणार नोटा
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत. एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. त्यामुळे तयारीसाठी आरबीयकडून बँकांना विशेष अवधी देखील देण्यात आला आहे.
आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले पर्याय
1. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरीक 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.
2. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.
3. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.
4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
5. 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.
6. आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.
7. RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.