Milk Price Hiked : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. दुधाचे दर (Milk Price Hike) वाढवण्यात आले आहेत. एकीकडे पट्रोल-डिझेलचे दर मागील काही काळापासून वाढताना दिसत आहेत. गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही अलिकडच्या काळात वाढलेले पाहायला मिळाले आहेत. त्यातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूलने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF)
अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे अमूल दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


केव्हापासून लागू होणार दरवाढ?


अमूल ब्रँड अंतर्गत येणार अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर अमूल दुधाच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन किमती उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून लागू होतील. याचा अर्थ अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 56 रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर 50 रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड 31 रुपये आणि अमूल ताजा 25 रुपयांना तर अमूल शक्तीचा दर 28 रुपये असेल.




अमूलने दुधाचा दर वाढवण्याचं कारण काय?


अमूल कंपनीचा एकूण खर्च आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्यानं कंपनीने दुधाच्या दरात वाढ केल्याचं अमूल कंपनीनं सांगितलं आहे. गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या खर्चात दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. कंपनीला या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यातही आठ ते नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अमूल कंपनीने दुधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


मार्चमध्येही कंपनीनं वाढवले होते दर


अमूलने याआधी मार्च महिन्यामध्ये पॅकेज आणि ताज्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यामागे कंपनीने वाढत्या इंधन दराचं कारण देत वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दरवाढ केल्याचं सांगितलं होतं.