पाटणा: बिहारमधील बक्सर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने देशभरातील प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवलं.


मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे, असं मुकेश पांडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत म्हटलं आहे.

पाटण्याहून दिल्लीत

मुकेश पांडे काल सकाळी पाटण्याहून दिल्लीत आले होते. त्यानंतर सुमारे 14 तासांनी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर, माझ्या आत्महत्येची माहिती माझ्या नातेवाईकांना द्या. मी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील 742 नंबरच्या खोली घेतली आहे. तिथे माझ्या बॅगेत सुसाईड नोट आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे.

चार फोन नंबर

सुसाईड नोटमध्ये चार फोन नंबर देण्यात आले आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांचे नंबर आहेत. सध्या पोलिसांनी बॅगेतील सुसाईड नोटबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळे मुकेश पांडे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.

मामाच्या हार्ट अटॅकमुळे दिल्लीत

मुकेश पांडे हे बक्सरहून बुधवारी रात्री दिल्लीत आले होते. मामाला हार्ट अटॅक आल्यामुळे आपण दिल्लीला जात आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं.

दिल्लीतून गाझियाबादमध्ये कसे पोहोचले?

मुकेश पांडे संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील जनकपुरीत पोहोचले. इथे आल्यानंतर त्यांनी कुटुंबाला व्हॉट्सअप मेसेज करुन, आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.

त्या मेसेजनंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुकेस पांडे हे आपला फोन हॉटेलमध्येच ठेवून गायब झाले होते.

रात्री 8 वाजता गाझियाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला.

मुकेश पांडे यांची 31 जुलैला बक्सरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी आत्महत्या का केली हा मोठा प्रश्न आहेच, पण ते दिल्लीवरुन गाझियाबादला कसे पोहोचले हा ही मोठा प्रश्न आहे.