नवी दिल्ली : बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकीची तयारी तर जोरात केली होती. वेळेआधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली, जेडीयूमध्ये प्रवेश केला, इतकंच काय प्रचाराचं गाणंही चित्रीत झालं होतं. पण लग्नाची तयारी सगळी करावी आणि नवरीचाच पत्ता नाही, कारण गुप्तेश्वर पांडेंना उमेदवारीचं तिकीट मिळालं नाही.
जेडीयूने काल आपल्या सर्व 115 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात कुठेच गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नव्हतं. पांडेंचं मूळ गाव बक्सर विधानसभेत आहे, तिथूनच त्यांची निवडणुक लढण्याची इच्छा होती. पण जागा वाटपात ही जागा भाजपकडे आहे आणि भाजपनं ही जागा काही त्यांना सोडली नाही किंवा भाजपही त्यांना तिकीट द्यायला उत्सुक दिसली नाही.
गुप्तेश्वर पांडेंचा बिहार विधानसभेच्या रिंगणातून पत्ता कट, पांडेंची मोठी घोषणा
नितीश सरकारची चाकरी करताना या गुप्तेश्वर पांडेंनी सुशांत सिंह प्रकरणात हद्द केली होती. इतक्या उघडपणे वर्दीतला माणूस जे बोलू शकत नाही ते पांडे बोलत होते. रियाची औकात काढत होते. दुसऱ्यांची औकात सांगणाऱ्या पांडेंना आज स्वत:ची औकात कळली असावी.
पांडे निवडणुकीत उतरणार म्हटल्यावर इकडे महाराष्ट्रातल्या पक्षांनीही जोरदार तयारी केली होती. शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमदेवार द्यायचं नक्की केलं होतं. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रविरोधी पांडेंच्या प्रचाराला जाणार का असा सवाल केला होता.
बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज : अनिल देसाई
अशा स्थितीत पांडेंचं तिकीट हे महाराष्ट्र भाजपसाठी काहीसं डोकेदुखीचंच ठरलं असतं. गुप्तेश्वर पांडे यांनी याच्या आधीही लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून तिकीट मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होणार होते. पण त्याआधीच बिहार निवडणुकीचं टायमिंग साधत त्यांनी स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली. बिहारमध्ये विधानसभेसोबतच लोकसभेची एक पोटनिवडणुकही होत आहे. पण तिथेही पांडेंचा नंबर लागला नाही. त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं जातं का हे पाहावं लागेल.
तिकीट नाकारल्याने पांडेंचं निवडणुकीचं स्वप्न भंगलं. राजकारणात अशा लोकांना अडॉप्ट करण्याचे इतर अनेकही मार्ग आहेत. त्यामुळे पांडेंचं पुढेमागे पुनर्वसन होईलही, पण एक गोष्ट नक्की आहे त्यांना तिकीट देऊन सुशांत सिंह प्रकरणााच्या मुद्द्यावर प्रचाराची रिस्क राजकीय पक्षांना नको आहे याचे संकेत यातून दिसत आहेत. हा अजेंडा फेल ठरल्याचीच ही लक्षणं.
Gupteshwar Pandey|गुप्तेश्वर पांडेंचा बिहार विधानसभेच्या रिंगणातून पत्ता कट,पांडेंनी केली मोठी घोषणा