बंगळुरु : देशाच्या विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळवणाऱ्या भाजपच्या विजयी रथाला कर्नाटकात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिल्याने, अमित शाहांना कर्नाटकातील मठाधिपतींनी दणका दिला आहे. तब्बल 220 मठांनी काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली आहे.


कर्नाटकात सध्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म देण्याची मागणीने जोर धरला आहे. या मागणीसाठी आग्रही असलेल्या मठाधिपतींनी अमित शहांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी 220 मठांच्या मठाधिपतींनी बैठक घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली.

त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, लिंगायत समाजाने मठाधिपतींच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचे ठरवल्यास, कर्नाटकात भाजपच्या विजयीरथाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

बंगळुरुच्या बसव भवनमध्ये झालेल्या बैठकीत चित्रादुर्गाचे प्रसिद्ध मुरुगा मठाचे मठाधिपती राजेंद्र स्वामी, बसव पीठाच्या प्रमुख माता महादेवी, सुत्तुर मठाचे मठाधिपतींसह एकूण 220 मठाचे मठाधिपती सहभागी झाले होते. या बैठकीत सर्व मठाधिपतींनी काँग्रेसला समर्थन देण्याचा एकमताने निर्णय घेतला.

केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही. त्यांची मदत केली. त्यामुळे या निवडणुकीत सर्व मठांचं सिद्धरामय्या यांनाच समर्थन मिळेल.”

तर दुसरीकडे अमित शाह यांनी वीरशैव धर्मगुरुंच्या भेटी घेतल्या होत्या. या भेटींदरम्यान केंद्र सरकार कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा प्रस्ताव फेटाळून लावेल, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, कर्नाटकातील लिंगायत समाजातील वीरशैव समाज हा काँग्रेसच्या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे.