एटीएममधून 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा पैसे काढा, नो सरचार्ज!
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 08:37 PM (IST)
मुंबई : एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील एटीएम मशिन्स एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणारा हा निर्णय घेताना सुरुवातीच्या काळात काही अडचणी किंवा गैरसोयींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. याचसाठी 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना ग्राहकांना एटीएममधून कितीही वेळा पैसे काढता येणार आहेत. तूर्तास एटीएममधून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांची रक्कमच एका दिवशी काढता येईल. त्यामुळे अनेक जणांना वारंवार एटीएमच्या किंवा बँकेच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. मात्र महिन्याला एटीएममधून मोफत ट्रान्झॅक्शन करण्यावर बंधन असल्यामुळे अनेकांना अतिरिक्त शुल्क द्यावं लागण्याची भीती सतावत होती. परंतु आता ही चिंता दूर झाली आहे.