भोपाळ : बहुतांश भारतीयांना आपल्या सावळ्या/काळ्या रंगाचा न्यूनगंड असतो. असाच न्यूनगंड असलेली एक महिला तिच्या पाच वर्षांच्या सावळ्या मुलाला गोरं करण्यासाठी त्याला चक्क दगडाने घासत होती. हा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमधला आहे.


सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून तिने मुलाला दत्तक घेतलं होतं. गोरं करण्यासाठी महिला त्याचं शरीर दगडाने घासत होती, अशी माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि लाईल्ड लाईनने या मुलाची सुटका केली. महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाईल्ड लाईनला दिली होती.

आरोपी महिलेने उत्तराखंडच्या मातृछायामधून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतलं होतं. आरोपी सुधा तिवारी व्यवसायाने शिक्षिका असून ती सरकारी शाळेत शिकवते. तर महिलेचा पती खासगी रुग्णालयात काम करतो, असं तक्रारदार शोभना शर्माने सांगितलं.

शोमना शर्मा म्हणाल्या की, "सुधाने ज्या दिवसापासून मुलाला भोपाळमध्ये आणलं, त्यादिवसापासून तिला त्याचा सावळा रंग पटत नव्हता. तिने मुलावर खूप उपचार केले. सुमारे एक वर्षापूर्वी कोणीतरी तिला सल्ला दिला की, मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घासलं तर तो गोरा होऊ शकतो. यानंतर महिलेने मुलाचं शरीर काळ्या रंगाच्या दगडाने घासायला सुरुवात केली. पण यामुळे मुलाच्या मनगट, खांदा, पाठ आणि पायांना जखम झाली आहे."

मुलाची सुटका केल्यानंतर त्याला हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला चाईल्ड लाईनला पाठवण्यात आलं.

"नियमानुसार, दत्तक घेतल्यानंतर मातृछाया आश्रमाकडून मुलाबाबत माहिती घेणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असंही शोभना शर्मा यांनी सांगितलं. मी सुधाला अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही तिने मुलाचा छळ बंद केला नाही. त्यामुळे चाईल्ड लाईन आणि पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता," असंही शोभना यांनी सांगितलं.

"मुलाची आईच्या तावडीतून सुटका केली तेव्हा त्याची अवस्था वाईट होती. त्याच्या शरीरावर जखमा होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं," असं चाईल्ड चाईलच्या संचालिका अर्चना सहाय यांनी सांगितलं.

"तर आम्ही फोनद्वारे मुलाची विचारपूस करत होतो," असा दावा बाल आयोगाच्या सदस्य आणि मातृछायाच्या सहसचिव अमिता जैन यांनी केला आहे.