मुंबई : अजय देवगणच्या आगामी 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमातील सैफ अली खाननंतर आता इतर व्यक्तीरेखांची माहितीही जारी करण्यात आली आहे. तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, औरंगजेब अशा प्रमुख भूमिकांमध्ये कोण झळकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे.
अजय देवगण सिनेमात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान उदयभान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या पोस्टरमध्ये सैफ हातात तलवार घेऊन बसल्याचे दिसत आहे. अजय देवगणने ट्वीट करत म्हटलं की, उदयभानच्या दरबारात चुकीला माफी नाही, तर केवळ शिक्षा मिळते.
तानाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक जारी करताना अजय देवगणने म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, दगडाने ठेच तर सगळे खातात, मात्र दगडाला टक्कर देणारा मराठा.
माता जिजाऊ यांच्या भूमिकेत पद्मावती राव या दिसणार आहेत. माता जिजाऊ यांच्याबाबत अजय देवगणने लिहिलं की, जो पर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकणार नाही, तोवर चप्पल घालणार नाही.
याशिवाय औरंगजेबचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. अभिनेता ल्यूक केनी सिनेमात औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अजय देवगणने लिहिलं की, औरंगजेब मुघल बादशाह, संपूर्ण हिंदुस्थानावर साम्राज्य करण्याचं स्वप्न बाळगणारा बादशाह.
तानाजी द अनसंग वॉरिअर सिनेमात अजय देवगणसोबत त्यांची पत्नी काजोलही दिसणार आहे. दिग्दर्शक ओम रावत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तर अजय देवगण आणि भूषण कुमार सिनेमाची निर्माते आहेत. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.