पाटणा : बिहारच्या राजकारणाला मोठं वळण मिळालं आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये उलथापालथ झाली आहे. पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिण्यात आलं आहे. आम्हाला स्वतंत्र मान्यता मिळावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. हे पाचही खासदार जेडीयूमध्ये प्रवेश करु शकतात.


एलजेपीमध्ये मोठी फूट
ज्या पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे त्यात पासुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर यांचा समावेश आहे. सर्व सर्व खासदार बिहार विधानसभा निवडणुकीपासून चिराग पासवान यांच्यावर नाराज होते, असं समजलं. एलजेपीमध्ये या फुटीची अटकळ आधीपासूनच बांधली जात होती पण हे खासदार मोठं पाऊस कधी उचलणार आणि चिराग पासवान यांची साथ सोडणार याची प्रतीक्षा होती. आता त्यांनी पाऊल उचललं असून एलजेपीसमोर मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे.


चिराग पासवान यांच्यासाठी राजकीय संकट
बिहार विधानसभा निवडणुकीत एलजेपीने जेव्हा भाजप-जेडीयूपासून वेगळं होऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासूनच त्यांच्या पक्षातील नेते चिराग पासवान यांच्यावर नाराज होते. निवडणुकीच्या निकालातूनही स्पष्ट झालं की चिराग यांच्या पक्षामुळेच अनेक ठिकाणी जेडीयूच्या जागा कमी आल्या. यानंतर आता जर एलजेपीच्या पाच खासदारांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला तो चिराग पासवान यांच्यासाठी मोठा धक्का समजला जाईल.


चिराग पासवान यांच्यावरील नाराजीमुळे या पाचही खासदारांनी उघड बंडखोरी केल्याचं समजतं. सूत्रांच्या माहितीनुसार, "या पाचही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मागणी केली आहे की त्यांना एलजेपीपासून स्वतंत्र मान्यता मिळाली." हे खरं असेल तर पाचही खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला असून त्यांचं प्रत्येक पाऊल चिराग पासवान यांच्यासाठी बिहारच्या राजकारणात अडचणी निर्माण करणारी ठरु शकतात.


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंध?
तसंही सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहत आहे. राजकीय वर्तुळात यावरुन छुप्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. जर एलजेपीच्या या पाच खासदारांनी चिराग पासवान यांची साथ सोडली तर बिहारच्या राजकारणा मोठी उलथापालथ पाहायला मिळेल.