भागलपूर: बिहारच्या भागलपूरमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. भागलपूर-नवगछिया मधील करारी दियारा गावामध्ये गंगा नदीत नाव पलटी झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या अपघातात जवळपास 100 लोक अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या नावेमध्ये जवळपास 125 लोक होते. अचानक नाव पलटी झाल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी आहेत. तर अद्याप 100 लोक बेपत्ता आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी गोपालपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत पाच मृतदेह हाती लागले आहेत.
माहितीनुसार या नावेमध्ये मजूर, शेतकरी, लहान मुलं आणि काही महिला होत्या. जे आपल्या शेतांमध्ये कामासाठी गंगा नदीच्या पलीकडील बाजूला या नावेतून जात होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य व्यवस्थित केलं जात नसल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. प्रशासनावर यामुळं लोकांचा रोष आहे. लोकांनी आरोप केला आहे की, प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रणव कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत. ते या घटनेवर नजर ठेवून आहेत.