Bengaluru Rains Updates: बेंगळुरूमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले. पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर एक लहान मुल बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. बेंगळुरू शहरात सुमारे दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत (Bengaluru Heavy Rain) असल्याने अंडरपासमध्ये पाणी साचले होते. यामध्ये एक कार पाण्यात बुडाली. या कारमध्ये 6 जण होते. या घटनेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
कार बुडाल्यानंतर कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सुटका करत रुग्णालयात दाखल केले. कारमधील एका महिलेचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. भानू रेखा असे या महिलेचे नाव आहे. त्याचवेळी एक लहान मुलही बेपत्ता झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील 6 लोक हैदराबादहून बंगळुरूला आले होते, मात्र रविवारी (21 मे) दुपारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे ते येथे अडकले.
मुख्यमंत्र्यंनी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, "कुटुंबाबद्दल सहानुभूती आहे आणि भानू रेखाच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल." यासोबतच त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांवर मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, मृत तरुणी भानूरेखाला रुग्णालयात आणले तेव्हा ती जीवित होती आणि तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी या आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
साडी आणि दोरीच्या मदतीने बचाव मोहीम
पीडित हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत. या कुटुंबाने कार भाड्याने घेत बेंगळुरूला भेट दिली होती. भानुरेखा इन्फोसिसमध्ये काम करतात. मुसळधार पावसामुळे अंडरपासवरील बॅरिकेड खाली पडले आणि ड्रायव्हरने अंडरपास ओलांडण्याची जोखीम पत्करली. अंडरपासमधील पाण्याची पातळी लक्षात न घेता कार चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या मध्यभागी कार आल्यानंतर जवळपास पाण्यात बुडाली. त्यामुळे कारमध्ये बसलेले लोक स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर आले. पावसामुळे पाण्याची पातळी वाढत होती. कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच आजूबाजूचे लोक त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले. लोकांनी त्यांना साड्या आणि दोरीच्या साहाय्याने तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी सांगितले की, अडकलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. त्यापैकी दोघांना आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. तर इतरांना शिडी वापरून बाहेर काढण्यात आले. भानू रेखा बेंगळुरू येथील इन्फोसिस कंपनीत काम करत होत्या.
महिलेची सुखरुप सुटका
केआर सर्कल येथे एक ऑटोरिक्षाही पाण्यात अडकली होती. या रिक्षातील एका महिला प्रवाशीने वाहनावर चढून आपला जीव वाचवला. तिची सुटका करण्यात स्थानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शहराच्या मध्यभागी असलेल्या मॅजेस्टिकजवळील आणखी एका जलमय अंडरपासवर अनेक वाहने अडकली. लोकांना वाहनांमधून बाहेर पडण्यासाठी खूप धडपड करावी लागली.