Bengaluru News : बंगळुरु शहर हे आयटी हब असून बरेच तरुण कामानिमित्त तिथे शिफ्ट होतात. मात्र, आधीच भाड्यानं घर मिळणं मुश्किल असलेल्या बंगळुरु (Bengaluru) मधील घरमालकांच्या अटीदेखील वाढल्या आहेत. एका व्यक्तीला बारावीत कमी गुण मिळाल्याने घरमालकाने (landlord) घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरुमध्ये घडला आहे.
अनेक स्टार्टअप्सचं माहेरघर आणि आयटी हब असलेले बंगळुरु शहर अवाजवी घरभाडे आणि घरमालकांच्या अवास्तव मागण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कामानिमित्त बंगळुरुमध्ये शिफ्ट होणाऱ्या तरुणांना या समस्या नेहमीच जाणवतात. यातच ही अविश्वसनीय घटना उघडकीस आली. एका शुभ नामक व्यक्तीने त्याच्या भावासोबत घडलेला प्रसंग ट्विटरवर शेअर केला आहे. घर भाड्यावर उपलब्ध करुन देणारा ब्रोकर आणि चुलत भावामधील संभाषण त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे.
शुभचा भाऊ, योगेश याला बंगळुरुमध्ये भाड्याने घर पाहिजे होते, अर्थातच बंगळुरुमध्ये शिफ्ट होताना स्वत: घर शोधणे फारच कठीण काम आहे. त्यामुळे योगेश नावाच्या तरुणाने थेट ब्रोकरशी संपर्क साधला. ब्रोकरसोबत त्याची एका घराबाबत बोलणी सुरु होती, घरमालकाच्या अटी ब्रोकरने योगेशला समजावून सांगितल्या. यावेळी ब्रोकरने योगेशला त्याचे लिन्क्डइन (LinkedIn), ट्विटर (Twitter) प्रोफाइल, तो ज्या कंपनीत नोकरीसाठी आला त्याचे जॉइनिंग लेटर, त्यासोबतच इयत्ता दहावी आणि बारावीची मार्कशीट, आधार आणि पॅनकार्ड शेअर करण्यास सांगितले. यासोबतच त्याला स्वत:बद्दल 200 शब्दांचा लेख देखील लिहायला सांगितला.
घरमालकाच्या मागणीप्रमाणे योगेशने ही सर्व कागदपत्रं ब्रोकरला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. आता इतक्या सगळ्या प्रक्रियेनंतर एक विचित्र प्रकार समोर आला. योगेशला बारावीत फक्त 75 टक्के पडल्यामुळे घरमालकाने घर नाकाल्याचे ब्रोकरने योगेशला कळवले. "घरमालकाला बारावीमध्ये 90 टक्के अपेक्षित होते, मात्र तुला 75 टक्के गुण मिळाले आहेत" असे ब्रोकरने योगेशला सांगितले.
घडलेल्या प्रसंगाचा प्रकार ट्विट करताना योगेशच्या भावाने ट्विटरवर एक रंजक कॅप्शन दिलं आहे. "गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, परंतु तुम्हाला बंगळुरुमध्ये फ्लॅट मिळेल की नाही हे निश्चितपणे ठरवते" असं तो कॅप्शनमध्ये म्हणाला. तर, संबंधिक घरमालक हा IIM या प्रख्यात इन्स्टिट्यूटमधील निवृत्त प्राध्यापक असल्याचेही त्याने सांगितले.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना त्याचा अनुभवही सांगितला आहे. "बंगळुरुमध्ये जर तुम्ही मोलकरणीला तुम्ही आयटी कंपनीत काम करता असे सांगितले तर ती घरकामासाठी दहमहा 30 हजार मागेल आणि हेच जर तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम करत नाही हे तिला पटवून देऊ शकलात तर ती घरकामासाठी दरमहा 9 हजार मागेल", असे त्या नेटकऱ्याने सांगितले. तर "लवकरच आम्ही बंगळुरुला शिफ्ट होत असून भाड्याने घर मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षेच्या तयारीत आहोत" अशी गमतीशीर प्रतिक्रिया दुसऱ्या नेटकऱ्याने दिली आहे.
बंगळुरुमध्ये जॉब मिळवणे कठीण आहे, पण त्यापेक्षा कठीण बंगळुरुमध्ये घर मिळवणे असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर, अशा प्रकारचे घरमालकांचे विचित्र प्रकार नेहमीच समोर येतात. घरमालकांकडून लिन्क्डइन (LinkedIn) प्रोफाइल, दहावी, बारावीच्या मार्कशीटची मागणी आणि त्यावरुन पात्रता ठरवणे, घर द्यावे की नाही हे ठरवणे बंगळुरुमध्ये नेहमीचे झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: