Bengaluru Blast : बेंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwar Cafe Blast) काल बॉम्बस्फोट झाला, ज्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा हादरल्या. बॉम्बस्फोट झाल्यानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्डचे पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये संशयित एका पिशवीसह दिसत आहे, ज्यामध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयिताच्या पिशवीत टायमरचा वापर करून आयईडी बॉम्बचा वापर करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले


 


रामेश्वरम कॅफेमध्ये भीषण स्फोट, नऊ जण जखमी


कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. शनिवारी समोर आलेल्या ताज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण बॅग घेऊन रेस्टॉरंटकडे जाताना दिसत आहे. या बॅगमध्ये स्फोटक साहित्य ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 7-8 पथके तयार केली आहेत.



सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताची ओळख पटवली


दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत तपास करताना, पोलीस सूत्रांनी सांगितले की, कॅफेमध्ये झालेला बॉम्बस्फोट हा टायमरचा वापर करून IED बॉम्ब निर्माण करून करण्यात आला. या प्रकरणातील ताजे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये संशयित पांढरी टोपी आणि मास्क घातलेला, खांद्यावर बॅग घेऊन कॅफेच्या दिशेने जाताना दिसत आहे. पोलिसांनी शुक्रवारी सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताची ओळख पटवली. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांचे वर्णन सुमारे 28 ते 30 वर्षांचे तरुण असे केले आहे. त्याने पिशवी एका झाडाजवळ (कॅफे शेजारी) ठेवली आणि निघून गेला. तासाभरानंतर हा स्फोट झाला.


 


बसने आले आरोपी, फॉरेन्सिक अहवाल येणे बाकी


हॉटेलच्या फ्लोअर मॅनेजरने पोलिसांना सांगितले होते की, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद बॅग सोडताना पाहिले होते. व्हाईटफिल्ड परिसरात ज्या ठिकाणी स्फोट घडला, त्या ठिकाणाहून पोलिसांनी एक टायमर आणि आयईडीचे इतर भाग देखील जप्त केले आहेत, फॉरेन्सिक अहवाल येणे बाकी आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, संशयित बीएमटीसी बसने घटनास्थळी पोहोचल्याची पोलिसांना माहिती आहे. आम्ही अनेक टीम तयार केल्या आहेत, सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावे गोळा केले आहेत. स्फोट झाला. तेव्हा बीएमटीसीची बस त्या मार्गावरून जात होती. तो बसने आल्याची माहिती आमच्याकडे आहे, आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करू. केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) बेकायदेशीर (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बेंगळुरू पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास संस्था (NIA) देखील या घटनेचा तपास करत आहे. सात ते आठ संघ तयार करण्यात आले आहेत.



तो टायमर सेट करून निघून गेला


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, स्फोट झाला हे खरे आहे, मास्क आणि टोपी घातलेला एक माणूस कॅफेमध्ये एका जागी बसला. तो टायमर सेट करून निघून गेला. मी घटनास्थळी जाईन. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याला शोधू. ते पुढे म्हणाले की, मी दहशतवाद्यांचा निषेध करतो. आपण राजकारण करू नये. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. 


 


हेही वाचा>>>


Bengaluru Blast : 'आईचा फोन आला नसता तर, आज मी जगात नसतो...', बेंगळुरू स्फोटाच्या साक्षीदाराने सांगितला थरारक अनुभव