बंगळुरु : मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन टेबलवर रुग्ण चक्क गिटार वाजवत होता. ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या भगवान महावीर जैन हॉस्पिटलमधील  आहे.


37 वर्षीय अभिषेक प्रसाद या तरुणाल 'म्युझिशियन्स डिस्टोनिया' हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्याच्या डाव्या हाताची तीन बोटं बधीर झाली होती. वाद्य वाजवणाऱ्या रुग्णाच्या स्नायूंची हालचाल अतिप्रमाणात झाल्याने म्युझिशियन्स डिस्टोनिया हा आजार होतो.

मूळचा बिहारचा असलेल्या अभिषेकवर जवळपास सात तास अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान अभिषेक पूर्णत: शुद्धीवर होता. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया सुरु असतानाच तो चक्क गिटार वाजवत होता.

दीड वर्षांपूर्वी गिटार वाजवतानाच पहिल्यांदा स्नायू बधीर झाल्याचं अभिषेकच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मेंदूमध्ये बिघाड झालेला भाग शोधून काढण्यासाठी 'रिअलटाईम फीडबॅक' मिळणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याने गिटार वाजवण्याची आम्हाला मदत झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं.

या शस्त्रक्रियेदरम्यान, मेंदूचा काही भाग जाळून नष्ट केला. शस्त्रक्रियेआधी तरुणाच्या कवटीमध्ये चार स्क्रू घुसवून डोक्‍याभोवती एक फ्रेम निश्‍चित करण्यात आली. यानंतर एमआरआय स्कॅननंतर कवटीला 14 एमएम खोल भोक पाडण्यात आलं. यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला," असं या रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शरण श्रीनिवासन यांनी सांगितलं.

दरम्यान, शस्त्रक्रियेनेतर माझ्या बोटांमधील बधीरपणा 100% नष्ट झाला आहे. या शस्त्रक्रियेनंतर तीनच दिवसांत मला डिस्चार्ज मिळाला आणि आता मी गिटार वाजवण्यास तयार आहे," अशी प्रतिक्रिया अभिषेकने दिली.
पाहा व्हिडीओ