बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असून सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. तिथेच मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत. भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.


मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून कोरोना आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही मतमोजणी होणार आहे. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना  48 तास अगोदर केलेले कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना दाखवणे आवश्यक आहे.


मतमोजणी कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी यांनाही 48 तास अगोदर केलेले  कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना दाखवणे आवश्यक आहे. मतमोजणी केंद्रात उपचार केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्राला तीन पदरी सुरक्षा देण्यात येणार आहे.


कोरोना नियमावलीनुसार मतमोजणी कक्षाची संख्या वाढवण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यावर विजयोत्सव आणि मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विजयी उमेदवाराला देखील प्रमाणपत्र घेताना आपल्या सोबत केवळ दोन व्यक्तींना नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.